उद्योजकाची साडेसहा कोटींची फसवणूक   

पुणे : बनावट ई-मेल आयडी वापरून कोंढवा येथील उद्योजकाची साडेसहा कोटींची ऑनलाईन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. नीलेश अशोककुमार जैन (वय ३९, क्लोअर हायलँड, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात ई-मेल आयडी धारकावर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ऑनलाईन माध्यमातून २७ मार्च ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला.
 
जैन यांच्या ई-मेलवर दोन वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून मेल पाठवण्यात आले. या बनावट ई-मेल खात्यांमधून सिटी बँक आणि सिटीझन्स बँकेच्या अधिकृत प्रतिनिधींच्या नावाने संपर्क साधण्यात आला. त्यांनी बँकेच्या खात्यावर अनुक्रमे ४ लाख २३ हजार २०३ अमेरिकन डॉलर (अंदाजे ३ कोटी ६२ लाख रुपये) आणि ३ लाख ३४ हजार ५४० अमेरिकन डॉलर (अंदाजे २ कोटी ८८ लाख रुपये) जमा करण्याची मागणी केली. या खोट्या ई-मेल मधील विश्वासार्ह भाषाशैली आणि बनावट दस्तऐवजांच्या आधारे जैन यांनी पैसे हस्तांतरित केले. मात्र, नंतर यातील काही व्यवहार संशयास्पद वाटल्याने त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Related Articles